हुबळीतील जुन्या कोर्टाजवळील सुप्रसिद्ध साई मंदिरात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून पुन्हा एकदा मोठा गदारोळ झाला आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादाप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. मात्र, तपास सुरू असतानाही मंदिरात गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात घुसून आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन धक्काबुक्की झाली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आंदोलकांनी मंदिरातील दानपेट्यांना (हुंड्या) साखळदंड लावून टाळे ठोकले. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत दान गोळा करू नये, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिरातील क्यूआर कोड, स्कॅनर आणि बॅनर फाडून आपला संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे मंदिर परिसरात तणाव निर्माण झाल्याने उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपासाचा अहवाल येईपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments