hubbali

हुबळीतील जैन मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी

Share

हुबळी येथील होसूर क्रॉस जवळील जैन मंदिरात काल मध्यरात्री चोरीची मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती आणि दागिन्यांची लूट केली असून, या कृत्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

वाणिज्यनगरी हुबळीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. काल मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने होसूर क्रॉस परिसरातील जैन मंदिराला लक्ष्य केले. चोरी करण्यापूर्वी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी प्रथम मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबल कापल्या.

त्यानंतर चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून तीन मूर्तींवरील चांदीचे मुकुट, दोन चांदीची छत्रे, आरतीचे ताट आणि दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे १२ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि दानपेटीतील २५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.

घटनेची माहिती मिळताच विद्यानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत.

चोरट्यांनी कोणत्याही भीतीशिवाय भरवस्तीत घरफोडी केल्यामुळे हुबळीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस विभागाने या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Tags: