हुबळीमध्ये माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी मंत्रिमंडळ विस्तार, कोविड घोटाळ्याची चौकशी आणि आरोग्य भरतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. पक्षात समन्वय असून हायकामंडचा निर्णय सर्वांना मान्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिनेश गुंडूराव म्हणाले की, सरकारमध्ये बदल होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक असून यावर मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील. पक्षाचा आदेश शिरसावंद्य असून सर्वांनी मोठेपणा दाखवून काम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिनेश गुंडूराव यांनी दिली.
कोविड काळातील भ्रष्टाचार आणि कुन्हा आयोगाच्या चौकशीवर बोलताना त्यांनी कडक भूमिका घेतली. त्या काळात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून ठोस पुराव्यांच्या आधारे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
आरोग्य विभागातील रिक्त पदांविषयी माहिती देताना त्यांनी २२५ डॉक्टरांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले. ही भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ सरकारी औषधेच उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असून, तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच निकाली काढले जातील, असे दिनेश गुंडूराव यांनी नमूद केले.
राज्यातील वाढत्या तापमानाचा विचार करता आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र खाटांची सोय करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती दिनेश गुंडूराव यांनी दिली.


Recent Comments