हुबळी तालुक्यातील शिरगुप्पी येथील टॅक्सी चालकाच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत ९८.०८ टक्के गुण मिळवले आहेत. कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या शकुंतला हसबी हिने मिळवलेल्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरगुप्पी येथील पंडित नेहरू हायस्कूलची विद्यार्थिनी शकुंतला हसबी हिने परीक्षेत एकूण ६१३ गुण मिळवले आहेत. तिने कन्नड विषयात १२५, समाजशास्त्र आणि हिंदीत पैकीच्या पैकी १०० गुण, तर इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयातही उत्कृष्ट गुण संपादन केले आहेत.
शकुंतलाचे वडील चंद्रशेखर हसबी हे खासगी टॅक्सी चालक म्हणून काम करतात. उच्च शिक्षण न मिळाल्याने नोकरीची अडचण आली, मात्र मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत आहेत. भविष्यात बीए एलएलबी करून उच्च न्यायालयात वकील होण्याची आपली इच्छा असल्याचे शकुंतला हसबी हिने म्हटले आहे.
मुलीने मिळवलेल्या यशामुळे खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर हसबी यांनी दिली. तर शकुंतलाच्या शैक्षणिक प्रवासात तिला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे तिची आई जयश्री आणि भाऊ सूरज यांनी म्हटले आहे.
शकुंतलाचा मोठा भाऊ सूरज यानेही दहावीत हुबळी ग्रामीण तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला होता. त्याने बारावी विज्ञानात ९५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला होता. आता बहिणीने देखील ६१३ गुण मिळवून भावाचा वारसा पुढे चालवला आहे.


Recent Comments