Belagavi

बेळगावमध्ये ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

Share

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी बेळगावमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एस. निजालिंगप्पा साखर संस्थेत आयोजित या चर्चासत्रात उसाचे अधिक उत्पादन घेण्याचे वैज्ञानिक मार्ग साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

एस. निजालिंगप्पा साखर संस्था आणि साखर संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या ऊस विकास अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये माती परीक्षण, शाश्वत मृदा सुपीकता आणि खोडवा ऊस व्यवस्थापन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी अध्यक्षपद भूषवले, तर कृषी विद्यापीठ रायचूरचे माजी विस्तार संचालक डॉ. एस. जी. पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. धारवाड कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. व्ही. बी. कुलगोड आणि डॉ. एस. एस. नुली यांनी तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन केले. रोपाला पाणी घालून आणि शेतकरी गीताने या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

अध्यक्षीय भाषणात राजगोपाल यांनी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या संशोधन आणि ऊस विकास उपक्रमांची माहिती दिली. उसाची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे असून, संस्था शेतकऱ्यांना जैविक खते आणि कीटकनाशके पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मृदा सुधारणेचे कार्यक्रम राबवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्य अतिथी डॉ. एस. जी. पाटील यांनी भारतीय शेतीमध्ये मातीचे आरोग्य टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांत पाणी आणि खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनी क्षारपड होत असून त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला.

तांत्रिक सत्रात डॉ. व्ही. बी. कुलगोड यांनी माती परीक्षणाचे महत्त्व आणि नमुने घेण्याची शास्त्रीय पद्धत स्पष्ट केली. तर डॉ. एस. एस. नुली यांनी खोडवा उसाचे योग्य व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. सुतगुंडी यांनी केले, संतोषकुमार पुजारी यांनी स्वागत तर सचिन घटकांबळे यांनी आभार मानले. या चर्चासत्रात राज्यातील विविध साखर कारखान्यांचे ११० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: