Belagavi

बेळगावमध्ये जूनपर्यंत पाणी टंचाई भासणार नाही : मनपा आयुक्त

Share

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बेळगावमधील नागरिकांमध्ये पाणी टंचाईची भीती निर्माण झाली असली, तरी जूनपर्यंत शहराला पाण्याचा तुटवडा भासणार नाही, असे आश्वासन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिले आहे. राकसकोप जलाशयाची पाणी पातळी खालावली असली तरी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे.

बेळगाव शहरात एकूण ७३ हजार नळ जोडण्या असून दररोज १३५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये हिडककल धरणातून ८२ एमएलडी आणि राकसकोप जलाशयातून ५३ एमएलडी पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, राकसकोपची पातळी यंदा ५ फुटांनी खाली गेली आहे. गेल्या वर्षी एप्रिलअखेर पाणी पातळी २४६१ फूट होती, ती आता २४७.३ फूट इतकी खाली आली आहे.

यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे पाणी साठ्यात मोठी घट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी माहिती दिली की, जून महिन्यापर्यंत शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. शहरात पुरेसे टँकर उपलब्ध असून चार महत्त्वाच्या ठिकाणी पाण्याचे स्रोत निश्चित करण्यात आले आहेत, असे कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.

Tags: