Belagavi

बेळगावमध्ये पोलीस आणि अक्का पथकाच्या सतर्कतेमुळे रोखला बालविवाह

Share

बेळगावमधील वंटमुरी कॉलनी परिसरात होणारा एक बालविवाह अक्का पथक आणि पोलीस विभागाने यशस्वीरीत्या रोखला असून १७ वर्षीय मुलीची सुटका केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

गुरुवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईचा तपशील दिला. २० एप्रिल रोजी गस्तीवर असताना अक्का पथकाच्या कर्मचाऱ्यांना एका घरासमोर लग्नाचा मंडप दिसला. संशय आल्याने पथकाने तेथे जाऊन चौकशी केली असता, २१ एप्रिल रोजी या अल्पवयीन मुलीचा विवाह पुण्यात राहणाऱ्या एका तरुणाशी होणार असल्याचे समोर आले.

पोलिसांनी मुलीचे आधार कार्ड आणि जन्म दाखला तपासला असता, तिचे वय १७ वर्षे ४ महिने असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महिला पोलीस ठाणे, चाईल्ड हेल्पलाईन आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या ११२ क्रमांकाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत हा विवाह रोखला. सुटका करण्यात आलेल्या मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांविरुद्ध बेळगाव शहर महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

Tags: