हजारो वर्षांपूर्वी तीर्थंकरांनी दिलेला शांतता आणि अहिंसेचा संदेश आजही संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. जैन धर्मातील तत्त्वांचे पालन केल्यास समाजात कधीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे मत बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी व्यक्त केले.


आचार्य श्री धर्मसेन मुनींच्या सानिध्यात बेळगावच्या ऐतिहासिक कमल बस्तीमध्ये सुरू असलेल्या ‘धर्मचक्र आराधना महोत्सवा’चा आज समारोप झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुनील हणमण्णवर यांच्या अध्यक्षतेखाली कलशाभिषेक आणि समारोप सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ मचलवार सुदाम हरीविजय, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना राहुल शिंदे यांनी सुनील हणमण्णवर आणि त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या या भव्य सोहळ्याचे कौतुक केले. तर, मचलवार सुदाम यांनी कमल बस्ती ही वास्तू तीर्थंकरांच्या संदेशाची आठवण करून देणारी एक ऐतिहासिक प्रेरणा असल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक के. रामराजन म्हणाले की, “जैन समाजाने शिस्त आणि शांततेचा जो आदर्श घालून दिला आहे, तो सर्वांसाठी अनुकरणीय आहे. २००० वर्षांपूर्वीच तीर्थंकरांनी सलोखा आणि शांततेचा संदेश दिला होता. या तत्त्वांचे पालन केल्यास कायदा-सुव्यवस्थेला कधीही बाधा येणार नाही.”

यावेळी महोत्सवाच्या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments