Belagavi

टिळकवाडीतील रेल्वे गेटजवळील बॅरिकेट्स हटवण्यासाठी गृहमंत्र्यांना साकडे

Share

बेळगावमधील टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेट्समुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत बॅरिकेट हटाव संघटनेने गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांना निवेदन दिले.

गृहमंत्री बेळगाव दौऱ्यावर असताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष घोलप यांनी त्यांची भेट घेतली. या परिसरातील बॅरिकेट्स हटवून दोन पोलिसांची नेमणूक करावी आणि खासगी संकुलासमोरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी सुभाष घोलप यांनी केली. बॅरिकेट्समुळे पादचारी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठा वळसा घालावा लागत असून चुकीच्या ‘यू-टर्न’मुळे अनेक जीवघेणे अपघात झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

बॅरिकेट्समुळे या भागातील व्यापार मंदावला असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. दुसऱ्या रेल्वे गेटप्रमाणेच येथेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सिग्नल यंत्रणेचा वापर करावा आणि गतिरोधक बसवावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिले असून, यावेळी अनंत पाटील, अमित जोशी यांच्यासह अनेक स्थानिक उपस्थित होते.

Tags: