बेळगावमधील तुरमुरी कचरा डेपो आणि हलग्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत (एसटीपी) राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच विकासाची कामे पूर्ण केली जातील, असे स्पष्ट करत त्यांनी अवैध खाणकामावरही कडक ताशेरे ओढले आहेत.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, तुरमुरी येथील कचरा विल्हेवाटीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने नियोजन केले आहे. शहराच्या उत्तर, दक्षिण आणि यमकनमर्डी परिसरात कचरा डेपोसाठी जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन महिन्यांत तुरमुरी येथील ७० टक्के कचरा इतरत्र हलवण्यात येईल, अशी माहिती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
हलग्यातील एसटीपी प्लँटबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मागील भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रति एकर केवळ ३ लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र, आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही भरपाई ५० लाख रुपये प्रति एकर इतकी वाढवली आहे. लवकरच या प्रकल्पाचे कामही गतीने सुरू होईल, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
बेळगुंदी परिसरात सुरू असलेल्या अवैध खाणकामावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. अवैध खाणकामात गुंतलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या संदर्भात तातडीने पावले उचलण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी नमूद केले.


Recent Comments