काँग्रेस महिला विरोधी असल्याची टीका करणाऱ्या भाजपला महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले. महिलांना राजकीय आणि आर्थिक शक्ती काँग्रेसनेच दिली असून भाजप केवळ राजकारणासाठी आरक्षणाचे ढोंग करत असल्याची टीका लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.


बेळगावमधील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. देशात पहिल्या महिला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण काँग्रेसनेच दिले आहे. भाजपने महिला आरक्षण विधेयक घाईघाईने मांडले असून त्यामागे केवळ मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा हेतू दडला आहे. भाजपला महिलांची इतकीच काळजी असती तर मणिपूरमधील घटनेवर ते गप्प का राहिले असते, असा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला. भाजपचे लोक मनूवादी असून महिलांना चार भिंतींच्या आत ठेवणे हीच त्यांची संस्कृती असल्याची टीका त्यांनी केली.
निवडणुका जिंकणे हेच भाजपचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्हाला केवळ नावाला ‘नारी वंदन’ नको तर महिलांना प्रत्यक्ष संधी हवी आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले. मतदार यादीतील नावांच्या घोळाबाबत बोलताना त्यांनी आपल्या मतदारसंघातून सुमारे २३ हजार मतदारांची नावे रद्द होण्याची शक्यता वर्तवली. तसेच, बेळगाव हा मोठा जिल्हा असून मंत्रिमंडळात येथील ज्येष्ठ नेत्यांना अधिक संधी मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला देवकी, अश्विनी दळवडे, लता माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments