बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या सरकारी कृषी भवनात अवैधपणे सुरू असलेले दारूचे दुकान तातडीने बंद करून ही इमारत सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केली आहे.

सोमवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धगौडा मोदगी बोलत होते. शेतकऱ्यांच्या सेवा आणि कृषी उपक्रमांसाठी राखीव असलेल्या कृषी भवनाचा मूळ उद्देश गेल्या ६० वर्षांपासून डावलला जात असून, या इमारतीचा वापर व्यावसायिक गाळ्यांसाठी केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणे अपेक्षित आहे, तिथे दारूचे दुकान सुरू असणे हे कृषी क्षेत्राच्या प्रतिमेला तडा देणारे आहे. याचा सार्वजनिक नैतिकतेवरही वाईट परिणाम होत असल्याचे सिद्धगौडा मोदगी यांनी म्हटले.
सरकारी मालमत्ता असलेले हे भवन तातडीने प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याचा वापर केवळ कृषी संबंधित कामांसाठीच करावा. जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर भारतीय कृषक समाजाच्या वतीने कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशारा सिद्धगौडा मोदगी यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला शिवलीला मिसाळे, संजीव डोंगरगावी, शेखर गुरन्नवर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments