Belagavi

राकसकोप जलाशयाने गाठला तळ

Share

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने खालावल्याने शहरावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढल्याने जलाशयाने तळ गाठला असून, आगामी दोन महिने बेळगावमधील ५८ वॉर्डांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

बेळगावमध्ये यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा थेट परिणाम जलस्त्रोतांवर झाला आहे. अर्धा टीएमसी क्षमता असलेल्या राकसकोप जलाशयात आता केवळ ८ फूट पाणी उरले असून, जलाशय पूर्णपणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीमुळे ‘केयुआयडीएफसी’ (KUIDFC) अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात तातडीने बदल केले आहेत.

शहरात आता केवळ १ तास ४५ मिनिटेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, ज्या भागात ३ दिवसांनी पाणी येत होते, तिथे आता ४ दिवसांनी आणि जिथे ४ दिवसांनंतर पाणी येत होते, तिथे आता ५ ते ६ दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. उपलब्ध साठा लक्षात घेऊन प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.

पावसाळा सुरू होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. गाड्या धुण्यासाठी किंवा इतर अनावश्यक कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास कडक कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. वरुणाने कृपा न केल्यास बेळगावमधील नागरिकांसाठी आगामी काळ अधिक कठीण जाण्याची शक्यता आहे.

Tags: