राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री के. व्यंकटेश यांनी डीके शिवकुमार गटाला टोला लगावला आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील नेतृत्वबदल आणि मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चेवर रोखठोक उत्तरे दिली. डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणे यात काही चुकीचे नाही, मात्र सध्या तरी बदलाची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळातील ५० टक्के मंत्र्यांना डच्चू देण्याच्या सलिम अहमद यांच्या विधानावर व्यंकटेश म्हणाले की, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. हायकमांड जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेईल. पक्षात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे, हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. “मी स्वतः कोणत्याही निर्णयासाठी तयार आहे,” असे म्हणत त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करण्याचे संकेत दिले.
राजकीय घडामोडींसोबतच त्यांनी पशुसंवर्धन खात्याच्या कामगिरीचाही आढावा दिला. राज्यात वर्षातून दोनदा जनावरांचे लसीकरण केले जात असून आज बेळगावमधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पशुपालकांसाठी जनावर दगावल्यास १५ हजार आणि मेंढरांच्या मृत्यूसाठी ५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात आहे. तसेच सरकारने ३० गोशाळा सुरू केल्या असून खासगी संस्थांनाही मदत केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


Recent Comments