Dharwad

​धारवाडमध्ये २०० वर्षांनंतर ग्रामदेवी यात्रा साजरी

Share

धारवाडमधील माळापूर आणि कमलापूर परिसरात तब्बल २०० वर्षांनंतर ग्रामदेवीची यात्रा साजरी होत आहे. दोन शतकांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर होत असलेल्या या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून घराघरांत सण साजरा केला जात आहे.

धारवाडमधील माळापूर आणि कमलापूर भागात प्रामुख्याने कृषी कुटुंबांची वस्ती आहे. येथे दोनशे वर्षांनंतर ग्रामदेवीची यात्रा भरवण्यात येत असून देवीच्या मूर्तींची अत्यंत श्रद्धेने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या उत्सवाचा भाग म्हणून भंडाऱ्याची मोठी उधळण करण्यात आली असून संपूर्ण परिसर पिवळधमक झाला आहे.

​या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवाच्या सात दिवसांच्या कालावधीत येथील नागरिक अनवाणी राहून व्रत पाळतात. बुधवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी कमलापूरमध्ये देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण केली, ज्यामध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते.

​जाती-भेद विसरून हजारो भाविक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होत आहेत. गुरुवारी देखील देवीची मिरवणूक विविध प्रभागांतून काढण्यात येणार असून भंडाऱ्याचा हा उत्सव सुरू राहणार आहे. दोन शतकांनंतर आलेल्या या विशेष योगामुळे धारवाडमध्ये भक्तीचे चैतन्य पसरले आहे.

Tags: