धारवाड जिल्ह्याला बसलेल्या गारपिटीच्या तडाख्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. ज्या झाडांना रसाळ फळांनी लगडायला हवे होते, ती झाडे आता पूर्णपणे बोडकी झाली आहेत.
एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासकीय उदासीनता, अशा कात्रीत धारवाडचा आंबा उत्पादक शेतकरी सापडला आहे. यावर्षी आंब्याचा मोहर पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र अवकाळी पावसाने सर्व स्वप्नांचा चक्काचूर केला आहे.
धारवाड, हुबळी, कलघटगी आणि अळनावर परिसरातील आंबा बागायतदारांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या ‘हापूस’ला मोठा फटका बसला असून, बागांमध्ये आता फळांऐवजी केवळ पडझड पाहायला मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बागायतदार आणि व्यापारी सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. फळबागांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही फलोत्पादन विभागाचे अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंब्याच्या पिकावर अवलंबून असलेल्या अनेकांचे वर्षभराचे गणित या गारपिटीमुळे कोलमडले आहे.
धारवाड जिल्ह्यात साधारणपणे १२ ते १४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे पीक घेतले जाते. पेढ्याप्रमाणेच येथील हापूस आंबा सर्वदूर प्रसिद्ध आहे, परंतु यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षभर मेहनत करून हाती येणारे पीक निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. या संकटाच्या काळात जिल्हा प्रशासन किंवा फलोत्पादन मंत्र्यांनी अद्याप दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे हापूसचे उत्पन्न बुडाले असून, बागायतदारांच्या कष्टावर पाणी फिरले आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी आमची मागणी असल्याचे मजुनाथ मुम्मीगट्टी यांनी म्हटले.
धारवाडसह चारही तालुक्यांतील आंबा बागायतदार आता रक्ताचे आसू ढाळत आहेत. आतातरी फलोत्पादन विभागाचे अधिकारी बांधावर येऊन शेतकऱ्यांचे गार्हाणे ऐकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल


Recent Comments