NANDAGAD

जिल्हाधिकाऱ्यांचा दावा फोल; नंदगड, बेकवाडमध्ये पेट्रोलचा खडखडाट

Share

जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नसल्याचा दावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केला असला, तरी खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चित्र मात्र विदारक आहे. नंदगड आणि बेकवाड परिसरातील पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून इंधन संपल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.

खानापूर तालुक्यातील मुख्य केंद्र असलेल्या नंदगड आणि बेकवाडमधील पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी ग्रामीण भागातील पंपांना मात्र पुरवठा होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. नंदगड येथील पंप चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वीच इंधनाचे पैसे भरूनही संबंधित तेल कंपन्यांचे अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे पंप चालक हतबल झाले असून त्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

लांबचा प्रवास करून येणाऱ्या वाहनधारकांना पंपावरून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. “प्रशासन सर्व काही सुरळीत असल्याचे सांगते, पण आम्हाला थेंबभर पेट्रोलही मिळत नाही,” अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अधिकारी आणि तेल कंपन्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामीण जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

Tags: