बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा मार्केट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख २५ हजार रुपये किमतीचे १७६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून दोन महिला आरोपींना गजाआड केले आहे.

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास चक्रे फिरवून वड्डरवाडी येथील आरती ऊर्फ फरीदा चौगुले (२६) आणि सरस्वती रोखडे (४५) या दोन महिलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या महिलांनी २०२४ मध्ये चार वेळा चोरी केल्याची कबुली दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिला चोरलेले दागिने आरतीचा पती शिवा चौगुले याच्याकडे द्यायच्या. शिवाने हे सर्व दागिने वितळवून बेळगावमधील एका खासगी फायनान्समध्ये गहाण ठेवून त्यावर पैसे उचलले होते. पोलिसांनी या फायनान्सवर छापा टाकून ११.२५ लाख रुपये किमतीचे १७६ ग्रॅम सोने जप्त केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवा चौगुले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments