ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या घोषणेसाठी सुरू असलेले आंदोलन सात दिवस उलटूनही सरकारने त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत हमीभाव जाहीर न केल्यास बेळगाव शहर बंद करण्यात येईल, असा इशारा करवे शिवरामेगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकूडी यांनी दिला आहे.

बुधवारी बेळगाव येथील प्रवासी मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उसाला हमीभाव मिळवून देण्यामध्ये राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. “जिल्हाधिकारी व पालकमंत्री हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगतात, मग तुमची जबाबदारी काय आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आम्ही ७ नोव्हेंबरला बेळगाव बंद करून शेतकऱ्याला संपूर्ण पाठिंबा देऊ. सरकारने तात्काळ जागे व्हावे,” असे त्यांनी म्हटले.
कन्नड आंदोलक महांतेश रणगट्टीमठ बोलताना म्हणाले, “जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत उसाला हमीभाव जाहीर करावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. हा संतापाचा वणवा राज्यभर पसरण्यापूर्वी सरकारने लवकर उसाला हमीभाव जाहीर करावा. अन्यथा, राज्यभर आंदोलन छेडले जाईल,” असे त्यांनी म्हटले.
यावेळी शेतकरी नेते राघवेंद्र नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments