राज्य सरकारने कित्तूर कर्नाटकासाठीही स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, या मागणीसाठी ११ नोव्हेंबर रोजी सुवर्ण विधानसौधाजवळ एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती उत्तर कर्नाटक विकास वेदिकेचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी दिली.

बुधवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्यानंतरही उत्तर कर्नाटकाचा विकास झाला नाही. गेल्या १५ वर्षांपासून यासाठी संघर्ष केला जात आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सुवर्ण विधानसौध बांधून दीड दशकाचा काळ उलटला, तरी आजपर्यंत बंगळूर येथील सचिव स्तरावरील कार्यालये येथे स्थलांतरित करून उत्तर कर्नाटकाच्या विकासाला गती देण्यात आली नाही. यासंदर्भात आपल्या भागातील मंत्री आणि आमदारांनी आवाज उठवला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद बोलताना म्हणाले, “नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कल्याण कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली, ही बाब प्रशंसास्पद आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कल्याण कर्नाटकच्या मागण्यांना दिलेला प्रतिसाद गौरवणीय आहे. मात्र, कित्तूर कर्नाटकातही सुवर्ण विधानसौधमध्ये सचिव स्तरावरील कार्यालये त्वरित स्थलांतरित करावीत,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी विरुपाक्षय्या नीरलगीमठ, एम. व्ही. हिरेमठ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments