बेळगावमधील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यादव यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार जाहीर करणे अत्यंत निंदनीय आहे, अशी तीव्र नाराजी कन्नड क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी बेळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजश्री यांनी कन्नड भाषेसाठी कोणतेही काम केलेले नाही. त्यांच्या नावाची घोषणा कर्नाटक सरकारसाठी एक ‘काळीमा’ ठरली आहे. विधान परिषदेचे सदस्य नागराज यादव यांच्या पत्नी असल्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, अशी भावना निर्माण झाली असून, यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे, असे त्यांनी सांगितले.
“मराठा मंडळ शिक्षण संस्था नेहमीच कन्नड भूमी, भाषा आणि सीमा प्रश्नांसंदर्भात नकारात्मक भूमिका घेत आली आहे. तसेच, संस्थेने कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यासही विरोध केला आहे. संस्थेच्या कोणत्याही नामफलकावर कन्नड भाषा दिसत नाही.”
याशिवाय, राज्योत्सव पुरस्कार ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाच दिला जावा, या नियमाचे राजश्री यांच्या बाबतीत स्पष्टपणे उल्लंघन झाले आहे, असा आरोपही चंदरगी यांनी केला. त्यामुळे सरकारने स्वतःचा मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी, राजश्री यांना देण्यात येणारा हा पुरस्कार त्वरित स्थगित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
बेळगावमध्ये राज्योत्सव पुरस्कारासाठी अनेक मान्यवर पात्र आहेत. साहित्य, शिक्षण, रंगभूमी, पत्रकारिता तसेच कन्नड भाषेच्या चळवळीत अनेक महान व्यक्तींनी योगदान दिले आहे. या पात्र व्यक्तींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, त्यांना राज्योत्सव पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणीही अशोक चंदरगी यांनी यावेळी केली.


Recent Comments