बेळगावातील अनगोळ चिदंबर नगर येथील स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

अनगोळ येथील रहिवासी गोपाळ साळुंखे यांचे नुकतेच निधन झाले. आज दुपारी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी अनगोळच्या चिदंबर नगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला, तेव्हा तेथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे अंत्यसंस्काराचे सर्व विधी मृतांच्या कुटुंबीयांना स्वतःहून पूर्ण करावे लागले. “नगरसेवक उपस्थित असूनही संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु त्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही,” असा आरोप श्रीनिवास कडोळी यांनी केला.
मृत गोपाळ साळुंखे यांचे बंधू परशुराम साळुंखे यांनी आपली नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “जेव्हा मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला, तेव्हा कोणीही येऊन प्रतिसाद दिला नाही. नगरसेवकांच्या मदतीने संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण जेवण करण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले. अनेक तास उलटून गेले तरी ते परत आले नाहीत. शासनाकडून वेतन घेणारे कर्मचारी बेजबाबदारपणे वागत आहेत” अशी तक्रार त्यांनी केली.
मृताच्या जावयाने यावेळी प्रशासनाला विनंती केली की, “आज आमच्या घरातील सदस्याचे निधन झाल्यानंतर स्वतः आम्हालाच येऊन अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करावे लागले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी या स्मशानभूमीसाठी तात्काळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.” अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेमुळे बेळगाव महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Recent Comments