विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षातील भावी नेतृत्वावर आणि भाजपच्या राज्य नेतृत्वावर गंभीर राजकीय भाष्य केले आहे.

भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी बेळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वावर तोफ डागली. कर्नाटकात नोव्हेंबरमध्ये राजकीय क्रांती होणार असून, सतीश जारकीहोळी किंवा डी.के. शिवकुमार नव्हे, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असे भाकीत केले. याचवेळी त्यांनी भाजपच्या प्रदेश नेतृत्वालाही खुले आव्हान दिले. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमल्यास ‘जेसीबी पूजा’ करण्याची तयारी असल्याचे सांगत त्यांनी भाजप नेतृत्वाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजप आमदार यत्नाळ यांनी काँग्रेस नेते एम.बी. पाटील यांना लक्ष्य करत त्यांच्यात ‘नकली’ आणि ‘मूळ’ पाटलांचा संघर्ष सुरू झाल्याचे म्हटले. “जितकी धमक पाटील यांच्यात आहे, तितकीच माझ्यातही आहे,” असे सांगत त्यांनी सनातन धर्माचे समर्थन केले. तसेच, ‘भीम आर्मी’ मुस्लीम-समर्थित असून, दलित समाज आपलाच भाग असल्याचे त्यांचे म्हणणे होते. याशिवाय, त्यांनी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्यावरही टीका करताना त्यांच्या हृदयात बसवण्णा नाहीत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आमदार यत्नाळ यांनी पंतप्रधान मोदींनंतर योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस गेल्यानंतर स्वतःच मुख्यमंत्री व्हावे, अशी राज्यातील जनतेची भावना असल्याचे सांगत आपली मुख्यमंत्रीपदाची अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली. त्यांनी भाजप नेतृत्वावर अत्यंत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. विजयेंद्र यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष केल्यास ‘जेसीबी पूजा’ होईल, असा थेट इशारा दिला आणि अनेक भाजप नेते आपल्या संपर्कात असल्याचे नमूद केले. तसेच, बिहार निवडणुकीनंतर पक्षाने निर्णय न घेतल्यास ‘जेसीबी’ तयार असल्याचे सांगून, दिल्लीतील ‘आप’प्रमाणे कर्नाटकात आपला ‘पक्ष’ सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments