Belagavi

काँग्रेसकडून गुरुंवर आणि संपूर्ण हिंदू समाजावर अन्याय: संजय पाटील

Share

विधानसभा अध्यक्ष ‘रेकॉर्ड ब्रेक’ भ्रष्टाचार करत असून ते काँग्रेसच्या एजंटप्रमाणे वागत आहेत. “गुरुंनी माफी मागावी,” असे म्हणणारे एम.बी. पाटील हे गुरुंपेक्षा मोठे आहेत काय? गुरुंना शिक्षा देण्याची तयारी करणारा हा कोणता कायदा आहे? अशा शब्दात माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली आहे.

आज बेळगाव मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना माजी आम. संजय पाटील यांनी काँग्रेस वर निशाणा साधत काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला. विधानसभेत विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार बोकाळलाय. भाजप आमदारांवर दडपशाही सुरु आहे. याची न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी अशी मागणी करत विधानसभेचे आता ‘मसाज सेंटर’ झाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि अध्यक्ष हे भ्रष्टाचाराचे ‘ओपनिंग बॅट्समन’ बनले असून जर त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल, तर त्यांनी चौकशी करून ते सिद्ध करावे, अन्यथा आरोप सिद्ध झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. यांना विकासातील ‘वि’ देखील माहीत नाही. गॅरंटीच्या नावाखाली त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. साठ हजार शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश त्यांनी प्रत्येक पीडीओला दिले आहेत, धर्मगुरुंवर विचित्र कायदे लादून जात आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्याचे काम काँग्रेस कडून सुरु आहे. काँग्रेसवाले केवळ गुरुंवरच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजावर अन्याय करत आहेत. “गुरुंनी माफी मागावी, असे म्हणणारे एम. बी. पाटील गुरुंपेक्षा मोठे आहेत काय?” असा सवालहि त्यांनी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष गीता सुतार, ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, विश्वनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: