Belagavi

‘संजीवनी फाउंडेशन’तर्फे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती

Share

आपले शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे मत बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (बीम्स) मनोरुग्ण विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर टी. आर. यांनी मांडले.

मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने, ‘संजीवनी फाउंडेशन’च्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे तसेच मनोरुग्ण विभागाच्या डॉ. विजयालक्ष्मी पुरद यांची उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगिनाळ यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सामुदायिक उपक्रमांवर भर दिला. त्यांनी येत्या काही महिन्यांत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तत्पूर्वी, समुपदेशक सरिता सिद्दी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि पाहुण्यांचा परिचय कावेरी नेगी यांनी करून दिला.

यावेळी बोलताना डॉ. विजयालक्ष्मी पुरद यांनी मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणे होय, असे स्पष्ट केले. “ध्यान, व्यायाम आणि पुरेशी झोप यांसारख्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत,” असे त्यांनी सांगितले. जर तुम्हाला तणाव किंवा चिंतेने त्रस्त असल्याचे वाटत असेल, तर वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेण्यास संकोच करू नका. मानसिक आरोग्यासाठी मदत मागणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसून, उलट ते धाडसाचे लक्षण आहे, अशा शब्दांत त्यांनी लोकांना प्रोत्साहन दिले.

अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे म्हणाले की, प्रमुख पाहुण्यांनी मांडलेल्या विचारांमुळे मानसिक आरोग्याचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे. संजीवीनी फाउंडेशनने आयोजित केलेला हा कार्यक्रम मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. मानसिक स्वास्थ्य हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, हे आजच्या कार्यक्रमाने अधोरेखित केले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात संजीवनी फाउंडेशनच्या मानसिक पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रातील रहिवासी, पालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शिरहट्टी यांनी केले, तर प्रीती नागण्णावर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: