Chikkodi

चिक्कोडीत तालुका प्रशासनातर्फे महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात

Share

जीवनात केवळ संपत्ती कमवण्याऐवजी, आपले जीवनच संपत्ती म्हणून जगले पाहिजे. महर्षी वाल्मीकींनी आपल्याला वेळेचा आदर करणे, आपल्यातील उत्तम गुण आणि आनंद शोधणे तसेच समानतेने जगणे शिकवले आहे, असे मत सहाय्यक आयुक्त सुभाष संपगावी यांनी व्यक्त केले.

चिक्कोडी शहरात समाज कल्याण विभाग सभागृहात तालुका प्रशासन, समाज कल्याण विभाग, तालुका पंचायत आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री महर्षी वाल्मीकी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

डीडीपीआय सीताराम यांनी आपले मत व्यक्त केले. “जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ असलेल्या रामायणाची रचना करणारे महर्षी वाल्मीकी अत्यंत श्रेष्ठ आहेत. रामायणातील आदर्श, तसेच राम, सीता आणि लक्ष्मणांचे आदर्श समाजात उत्तम जीवन जगण्याची शिकवण देतात. वाल्मीकी हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी शिक्षक महेश मगदुम्म यांनी वाल्मीकींच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान दिले.

या कार्यक्रमाला नगर परिषदेचे उपाध्यक्ष इरफान बेपारी, तहसीलदार राजेश बुर्ली, नगर परिषदेचे सदस्य रामा माने, अनिल माने, संतोष, जुगळे, नागराज मेदार, अण्णासाहेब भीमानायक, तालुका समाज कल्याण अधिकारी अर्चना साने, उद्यानविद्या विभागाच्या सहायक उपसंचालिका एम.एस. हिंदीहोळ, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी शिवानंद शिरगांवे, नागराज कापसी, संजय देसाई आदी उपस्थित होते. शिक्षक एस.जी. चंगौड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Tags: