Chikkodi

चिक्कोडी : युवा काँग्रेसच्या परिषदेत केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका

Share

केंद्र सरकारकडून कर वाटपाच्या मुद्द्यावर कर्नाटकावर सातत्याने अन्याय केला जात असून, या विरोधात राज्यातील एकाही भाजप खासदाराने आवाज उठवलेला नाही. कन्नड जनतेला द्वेषपूर्ण नजरेने पाहणाऱ्या केंद्राला योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा तीव्र संताप कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष एच.एस. मजुनाथगौडा यांनी व्यक्त केला.

चिक्कोडी येथील युवा काँग्रेस परिषदेत प्रदेशाध्यक्ष एच.एस. मजुनाथगौडा यांनी केंद्राच्या आर्थिक धोरणांवर तीव्र टीका केली. कर्नाटक ४.५ लाख कोटी रुपये कर देत असूनही केंद्राकडून केवळ १४ पैसे (परतावा) मिळत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. ‘भाजप हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवत आहे. या जनविरोधी धोरणांबद्दल जनजागृती करा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज व्हा,’ असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी ‘पंच-गॅरंटी’ योजना यशस्वीपणे पोहोचवल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

राज्याचे युवा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “देशात भाजप पक्ष मत चोरी करून निवडणूक आयोगाचा गैरवापर करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण सर्वांनी निष्ठेने पार पाडली पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

या परिषदेत चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्‍मणराव चिंगळे, राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस निगम भंडारी, राज्य युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष अब्दुल देसाई यांनीही आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला राज्य सरचिटणीस सय्यद सादिक, बाहुबली जैन, राज्य सचिव उदय वीरगौडर, विधी विभागाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, माध्यम विभागाचे अध्यक्ष दीपकगौडा, चिक्कोडी जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष सिद्दिक अंकलगी, प्रभाकर कोरे, गणेश महावीर मोहिते, राजू कोठगी, एच.एस. नसालापुरे, शीतल मठपती यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत आशा पाटील यांनी केले.

Tags: