सर्वेक्षणाच्या वेळेस ‘धर्म’ या स्तंभामध्ये लिंगायत असे नमूद करावे आणि ‘जात’ स्तंभामध्ये लिंगायत सोबतच आपल्या पोटजाती/पोटपंथांचा उल्लेख करावा असे चिकोडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना बेळगाव जिल्हा जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी स्पष्ट केले.

चिकोडी येथील परटी नागलिंगेश्वर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बेळगाव जिल्हा जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी कर्नाटक सरकारच्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. सर्वेक्षणातील ‘धर्म’ स्तंभामध्ये (क्रमांक ८) लिंगायत असे नमूद करावे आणि ‘जात’ स्तंभामध्ये (क्रमांक ०९) लिंगायत या नावासोबतच आपल्या पोटजातींची नोंद करावी. या सर्वेक्षणात ६० स्तंभ असून कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि इतर विवरण समाविष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

बसवन्नांनी १२ व्या शतकात जात, पंथ, लिंग भेदभाव न करता समानतेवर आधारित लिंगायत या स्वतंत्र धर्माची स्थापना केली. त्यांनी अनुभव मंडपाद्वारे लोकशाहीची सुरुवात केली आणि वचन चळवळीतून अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. लिंगायत धर्माचे आचार विचार इतर धर्मांपेक्षा भिन्न आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांमध्येही याचा उल्लेख आहे. त्यामुळे बसव अनुयायांनी धर्म लिंगायत असाच नमूद करावा, असे ते ठामपणे म्हणाले.
जागतिक लिंगायत महासभेसह बसव समर्थक संघटनांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. आरक्षण सवलतींचा लाभ घेणाऱ्या पोटजातींनी धर्म स्तंभात लिंगायत नमूद केल्यास आरक्षणाला बाधा येणार नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लिंगायत धर्माला स्वतंत्र अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्यासाठी कर्नाटक सरकारने २०१८ मध्ये केलेला प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या जनजागृतीसाठी सप्टेंबर २०२५ पासून बसव संस्कृती अभियान सुरू असून, ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी बेंगळुरू येथील समारोप समारंभात सर्वांनी सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन महासभेने केले आहे.
या वेळी निडसोशी पंचमशिवलिंगेश्वर स्वामीजी, चिकोडी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गुडसी, रवींद्र हंपन्नवर, अशोक मळगली, सिद्धू पाटील, बसवराज मंटूर आदी उपस्थित होते.


Recent Comments