जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे परिणाम आता राजकीय क्षेत्राकडे वळू लागले असून राजकारण्यांकडून आता एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यामध्ये गोकाक तालुका अंमली पदार्थांचे केंद्र बनला आहे, असा टोला मंत्री जारकीहोळी यांना माजी खासदार रमेश कत्ती यांनी लगावला आहे.

गुरुवारी सायंकाळी यमकनमर्डी मतदारसंघातील हेब्बाळ गावात हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. ‘गोकाक तालुक्यात खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत आहे. शहरात तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतच दारूचे दुकान आहे. आपल्या मुलांचे भविष्य घडवणाऱ्या कार्यालयाच्याच इमारतीत दारूचे दुकान असण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. तेथील नेते भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून हे काम करवून घेत आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी जारकीहोळी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. ‘त्यामुळे तिथली ही संस्कृती आपल्या हुक्केरी तालुक्यात येऊ नये,’ अशी विनंती त्यांनी मतदारांना केली.

यावेळी व्यासपीठावर आमदार निखिल कत्ती, नेते विनय पाटील, पृथ्वी कत्ती, भाजपचे राज्य एसटी मोर्चा सचिव बसवराज हुंद्री, कलौडा पाटील आणि एन. एच. हुली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर बोलताना माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले की, ‘२००८ मध्ये यमकनमर्डी मतदारसंघ माहीत नसलेल्या सतीश जारकीहोळी यांना प्रत्येक गावात जाऊन मीच लोकांसमोर आणले. आता ते म्हणतात, की मी त्यांच्या लेखी काहीच नाही. पण येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत तालुक्यातील जनता मतांच्या माध्यमातून ‘मी कोण आहे’, हे जारकीहोळी यांना दाखवून देईल,’ असे त्यांनी म्हटले.
त्यानंतर, यमकनमर्डी मतदारसंघातील जनतेने नेत्यांना भव्य हार घालून सत्कार केला.
या निवडणुकीबद्दल माध्यमांशी बोलताना यमकनमर्डी मतदारसंघातील भाजपचे नेते बसवराज हुंद्री म्हणाले की, ‘२८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी आज यमकनमर्डी मतदारसंघातील पश्चापूर, हट्टाण हत्तरगी, हेब्बाळ आणि दड्डी जिल्हा पंचायत परिसरातील लोकांचे संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत रमेश कत्ती आणि ए. बी. पाटील यांच्या स्वाभिमानी पॅनेलचे उमेदवार निश्चितच विजयी होतील.’


Recent Comments