महाराष्ट्र राज्य तसेच कर्नाटकातील कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून मंगळवारी सायंकाळपासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग २ लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.

पुढील ४८ तासांत मोठ्या प्रमाणात पाणी अलमट्टी धरणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे.
महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याची आवक वाढत आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोयना धरणातून ८०,५०० क्युसेक आणि वारणा धरणातून ३६,६३० क्युसेक पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, कळ्ळोळ बॅरेजजवळ कृष्णा नदीला मिळणाऱ्या दूधगंगा नदीचा प्रवाह २१,८२४ क्युसेकपर्यंत पोहोचला असून, त्यामुळे कृष्णा नदीचा प्रवाहही १ लाख क्युसेकपेक्षा जास्त झाला आहे. अलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या घाटप्रभा नदीचा प्रवाहही वाढला असून, लोळसूरजवळून सुमारे ५० हजार क्युसेक पाणी येत आहे. हे सर्व पाणी पुढील ४८ तासांत अलमट्टी धरणात पोहोचेल, त्यामुळे पाण्याची आवक १.५० लाख क्युसेकपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीत २ लाख क्युसेक पाणी सोडले जात आहे. जर बुधवारीही पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग आणखी वाढू शकतो, असे धरण प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नदीकाठच्या पूरग्रस्त गावांमध्ये निडगुंदी तालुका प्रशासनाकडून ढोल वाजवून लोकांना सतर्क केले जात आहे, तसेच नदीच्या दिशेने लोक आणि जनावरांनी जाऊ नये अशा सूचना दिल्या जात आहेत.


Recent Comments