पश्चिम घाट आणि बेळगाव भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बागलकोट जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे. घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून, प्रति सेकंद ५३ हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ आणि रबकवी-बनहट्टी तालुक्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने तातडीने रबकवी-बनहट्टी तालुक्यातील नंदगाव आणि ढवळेश्वर गावांसह मुधोळ तालुक्यातील मिर्जि, ओंटगोडी, चन्नाळ आणि अक्किमराडी गावातील सखल भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. या पुरामुळे आतापर्यंत एकूण नऊ पूल पाण्याखाली गेले आहेत, ज्यात ढवळेश्वर, मिर्जि, चन्नाळ, जालीबेर, मुधोळ, जीरगाळ, इंगळगी, जांबगी केडी, कसबा जांबगी आणि तिम्मापूर येथील पुलांचा समावेश आहे.
घटप्रभा नदीतील पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता असल्याने, नदीकाठी जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये ढोल वाजवून धोक्याची सूचना दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाने पुलांच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला आहे. नदीकाठचे लोक पुन्हा एकदा पुराच्या भीतीने ग्रासले आहेत, तर काही गावांनी आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. “नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी सुरक्षा उपाययोजना केल्या जातील,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


Recent Comments