बसमधील खिडकीच्या जागेवरून कॉलेज विद्यार्थ्याला धमकी देऊन जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन पथके तयार करत दोन आरोपींना अटक केली. यापुढे शहरात धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई केली जाईल, तसेच ‘रौडीशिटर’ प्रकरण दाखल केले जाईल, असे शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.

बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लहान वयातच धारदार शस्त्रे घेऊन कायद्याचे भय न बाळगता सार्वजनिक ठिकाणी फिरणे हा गुन्हा आहे. विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून, कायद्याच्या कक्षेत आलेल्या आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहर पोलीस दलातर्फे आजपासून ‘घातक शस्त्र नियंत्रण पथक’ स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात पाच ते सहा कर्मचारी वाहनांच्या माध्यमातृन गस्त घालतील आणि संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींकडे धारदार शस्त्रे आढळल्यास त्यांच्यावर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, असे आयुक्त बोरसे यांनी सांगितले.
शिवाय, बेळगाव शहरात चाकू किंवा तलवारी घेऊन फिरणाऱ्यांवर ‘रौडीशिटर’ प्रकरणं उघडली जातील आणि प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सक्त ताकीद दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. चाकूने हल्ला करण्याच्या प्रकरणातील आरोपींना शोधून काढण्यासाठी डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय मंजुनाथ नायक, महांतेश दामण्णावर, बी. आर. गड्डेकर, पीएसआय विठ्ठल हावण्णावर आणि किरण हणकट्टी यांच्या पथकाने कायदेशीर कारवाई करून आरोपींना अटक केली, असे आयुक्तांनी नमूद केले.
याचवेळी, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे आणि हिरेबागवाडी हद्दीत चोऱ्या करणाऱ्या पाच आरोपींनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यांच्याकडून ३१० ग्रॅम चांदीचे दागिने, दोन दुचाकी आणि लोखंडी सळईसह एकूण १४.९५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


Recent Comments