आयपीएल अंतिम सामन्यात आरसीबीने मिळविलेल्या विजयाने चाहत्यांचे स्वप्न सत्यात उतरले असून या विजयानंतर बेळगावात आरसीबीच्या चाहत्यांनि मध्यरात्रीपर्यंत जल्लोष केला.

गेल्या १८ वर्षांपासून आरसीबीचे चाहते जे स्वप्न पाहत होते, ते काल सत्यात उतरले. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळणारा विराट कोहली प्रत्येक हंगामात चांगली कामगिरी करत संघाचा कणा राहिला आहे. तरीही, मागील १७ हंगामांमध्ये आरसीबी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही त्यांना ट्रॉफी जिंकता आली नव्हती.

पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात बंगळूर संघाने ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला. याचबरोबर त्यांनी आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. बेळगावातील गल्ली-गल्लीत आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या राणी चन्नम्मा चौकात आरसीबीच्या चाहत्यांच्या विजयोत्सवाला सीमा उरली नव्हती. जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून आरसीबी चाहत्यांनी आपला आनंद साजरा केला.
मध्यरात्री तीन वाजेपर्यंत हजारो आरसीबी चाहते मोठ्या उत्साहात नाचत होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याशिवाय, बेळगावातील रामतीर्थनगरमध्येही सुरेश यादव फाऊंडेशन आणि आरसीबी चाहत्यांकडून विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य चौकात हजारो आरसीबी चाहते जमले होते. त्यांनी फटाके फोडून, आनंद साजरा केला.


Recent Comments