Belagavi

विरोधी पक्षनेत्यांना संरक्षण नाही, दलितांना काय देणार? – पी. राजीव यांचा गृहमंत्र्यांना सवाल

Share

कर्नाटक राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, विरोधी पक्षनेत्यांनाही संरक्षण देण्यास गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील दलित आणि गरिबांना काय संरक्षण देणार, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. राजीव यांनी उपस्थित केला.

शुक्रवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजीव यांनी कलबुर्गीतील परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. “कलबुर्गी हे आता ‘रिपब्लिक ऑफ कलबुर्गी’ बनले आहे,” असे ते म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी यांच्यावर कलबुर्गीमध्ये पत्रकार परिषदेत हल्ला झाल्याचा आणि त्यांना अटक करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचा संदर्भ देत राजीव यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, “मी स्वतः पोलीस दलातून आलो आहे, पण यापूर्वी कधीही कायदा आणि सुव्यवस्था इतकी ढासळलेली पाहिली नव्हती. पोलिसांचे मौन दुर्दैवी आहे.”

नारायणस्वामी यांना कलबुर्गीमध्ये पाच तास ‘गृहबंद’ ठेवण्यात आल्याचा आरोप करत राजीव यांनी काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला. “खर्गे (प्रियांक खर्गे) हे बाहुल्यासारखे वागत आहेत आणि पोलीस काँग्रेसच्या एजंटप्रमाणे काम करत आहेत,” असे ते म्हणाले. पोलिसांच्या उपस्थितीत सरकारी वाहनाला काळे फासले जाते, ही सरकारची निष्क्रियता नाही का, असा सवाल त्यांनी केला. पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

“विरोधी पक्षनेत्यांना संरक्षण देऊ न शकणारे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हे राज्यातील गरीब आणि दलितांना काय संरक्षण देणार?” असा थेट सवाल राजीव यांनी विचारला. त्यांनी घोषणा केली की, प्रियांक खर्गे यांची ‘गुंडागर्दी’ आता खपवून घेतली जाणार नाही. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने उद्या ‘चलो कलबुर्गी’ आंदोलनाचे आवाहन केले आहे. “आपल्या वडिलांनी (मल्लिकार्जुन खर्गे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘विषारी साप’ म्हटले होते, तेव्हा आम्ही असे केले असते तर चालले असते का?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी प्रियांक खर्गे यांना केला.

या पत्रकार परिषदेला बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगरपालिका सदस्य हनुमंत कोगाळी, राजशेखर डोणी, रमेश देशपांडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: