Belagavi

धर्मशास्त्र परंपरेसाठी ‘श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल’ची स्थापना : मंजुनाथ भारती स्वामी

Share

 

भारतीय अध्यात्मिक परंपरा आणि धर्मशास्त्राचे महत्त्व आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हल्याळ येथे ‘श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल’ स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती बेंगळुरू गोसावी मठाचे पिठाधीश मंजुनाथ भारती स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय आध्यात्मिक परंपरा जगाला प्रेरणा देणारी आहे आणि आपला देश धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, आधुनिक युगात धर्मशास्त्र आणि परंपरेचा ऱ्हास होत चालला आहे. याच गोष्टीकडे लक्ष देऊन, धर्मशास्त्र परंपरेला पुन्हा पुढे नेण्यासाठी हल्याळ येथे श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल स्थापन करण्यात येत आहे, या कामात प्रत्येकाचे सहकार्य आणि योगदान महत्त्वाचे असल्याचेही मंजुनाथ भारती स्वामींनी सांगितले.

मंजुनाथ भारती स्वामी पुढे म्हणाले की, आजच्या काळात भरकटलेल्या तरुण पिढीला जीवनाची योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरुकुलांची नितांत आवश्यकता आहे. प्राचीन काळात ऋषीमुनींच्या कठोर साधनेतून आपणाला जीवनाचे ज्ञान प्राप्त झाले, त्यांच्या तपस्येमुळे ज्ञानाचे मोठे भांडार मिळाले आहे. प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्माला मोठे महत्त्व आहे. याच विचारातून, बेळगावपासून काही अंतरावर असलेल्या हल्याळ गावात पाच एकर प्रशस्त जागेत श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची स्थापना करण्यात येत आहे. या गुरुकुलात भारतीय संस्कृती, धर्मशास्त्र, योग, संगीत कला अशा विविध विषयांचे ज्ञान दिले जाणार आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिस्तीचे धडेही दिले जातील. श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलात पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व समाजातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. या उदात्त कामात समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने गुरुकुलाच्या स्थापनेसाठी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहनही मंजुनाथ भारती स्वामी यांनी यावेळी केले.

या पत्रकार परिषदेला मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिर्जे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड तसेच मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव उपस्थित होते.

Tags: