Belagavi

वडगावमधील सप्पार गल्ली-तेग्गिन गल्लीतील गटारी कचऱ्याने तुंबल्या

Share

बेळगावच्या वडगाव भागातील सप्पार गल्ली आणि तेग्गिन गल्ली येथे कचऱ्यामुळे गटारी तुंबून दुर्गंधी पसरली आहे. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून, संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याची मागणी करत गुरुवारी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना सुहासिनी गोणी म्हणाल्या, सप्पार गल्ली आणि तेग्गिन गल्लीच्या मधल्या अरुंद रस्त्यावर स्वच्छतेचा अभाव आहे. याकडे कुणी लक्ष देत नाही. कचरा आणून गटारात टाकत असल्याने ते तुंबले आहेत. कचरा काढायला कुणी नाही. संपूर्ण परिसरात प्रदूषण वाढले असून, डासांचा उपद्रवही वाढला आहे. परिणामी डासांमुळे आजार वाढत आहेत. केवळ पालिका सदस्यांच्या घरापर्यंतच गटारीचे बांधकाम झाले असून १५ दिवसातून एकदा कचरा काढतात, त्यामुळे स्वच्छता नसते. वॉर्ड क्रमांक ४० च्या पालिका सदस्या रेश्मा कामकर समस्या ऐकून जातात, पण तोडगा काढत नाहीत. सर्व कचरा तिथे आणून टाकतात. अतिप्रदूषणामुळे साथीचे रोग येत आहेत. तिथे राहणेही कठीण झाले आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली.

१५ दिवसातून एकदा येऊन गटारातील कचरा काढून बाजूला टाकून जातात. त्यामुळे दुर्गंधी आणि प्रदूषण वाढते. नगरसेवकांना सांगूनही काही उपयोग होत नाही. कामेही पूर्ण झालेली नाहीत. या भागातील अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे पाहुण्यांनी आपल्या घराकडे पाठ फिरवली असून विवाहेच्छुकांची स्थळे देखील आल्या पावली माघारी जात असल्याची प्रतिक्रिया शोभा हजेरी यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना आंदोलक महिलांनी या प्रभागाकडे लक्ष पुरवून येथील समस्या तातडीने सोडविण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. यावेळी गल्लीतील अनेक महिला उपस्थित होत्या.

Tags: