Belagavi

लिंबाळेंच्या विधानावर येळ्ळूर म. ए. समितीचा आक्षेप; माफीसह राजीनाम्याची मागणी

Share

पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी बेळगाव सीमा प्रश्नावर केलेल्या विधानाचे सीमाभागात पडसाद उमटले आहेत. त्यांच्या विधानाचा येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला असून, सीमाभागातील जनतेची माफी मागून संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

एका मुलाखतीत लिंबाळे यांनी बेळगाव पाकिस्तानात आहे का, मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करणे शक्य आहे का, तसेच सीमाभागातील जनतेने आपण राहत असलेल्या राज्याची भाषा आणि संस्कृती स्वीकारावी, अशी भूमिका मांडली होती. या विधानामुळे सीमाभागातील जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठाच्या अध्यक्षांकडून असे विधान होणे दुर्दैवी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

१९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला होता, याची लिंबाळे यांनी दखल घेतली नसल्याची टीका समितीच्या नेत्यांनी केली. त्यांनी आपले विधान मागे घेऊन सीमाभागातील जनतेची बिनशर्त माफी मागावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा साहित्य महामंडळाने त्यांना पदावरून हटवावे, अशी भूमिकाही मांडण्यात आली. महाराष्ट्र सरकार आणि साहित्य परिषदेकडून या प्रकरणाची दखल न घेतल्यास येळ्ळूरसह संपूर्ण सीमाभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या निषेध सभेला ज्येष्ठ नेते व्ही. डी. पाटील, दौलत कुगजी, डी. जी. पाटील, सतीश पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: