कागवाड वकील संघटनेतर्फे गुरुवारी सायंकाळी न्यायालयाच्या आवारात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ प्राध्यापकांनी युवा वकिलांना मार्गदर्शन केले, तर विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

विजापूर येथील विधी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक एफ. एस. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पंचायत राज व्यवस्था, युवा वकिलांना व्यावसायिक जीवनात येणारी आव्हाने आणि कायदे क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन याविषयी माहिती दिली. तसेच देशातील सध्याची राजकीय व्यवस्था, लोकशाहीची उद्दिष्टे आणि प्रशासनात संविधानाचे महत्त्व यावरही त्यांनी विचार मांडले.


कागवाड न्यायालयाच्या न्यायाधीश रूपा चेन्निवार यांनी न्यायालयाचे सध्याचे कामकाज, नव्याने लागू होत असलेले कायदे तसेच ज्येष्ठ न्यायाधीशांचे अनुभव आणि मार्गदर्शनाचे महत्त्व स्पष्ट केले. युवा वकिलांनी नियमितपणे न्यायालयात उपस्थित राहून प्रामाणिकपणे सेवा बजावल्यास कायदे क्षेत्रात अनुभव आणि प्रगती साधता येईल, असा सल्ला त्यांनी दिला.
वकील संघटनेचे अध्यक्ष बी. आर. राव यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना, कायद्याचे शिक्षण घेत असताना प्राध्यापक एफ. एस. पाटील यांच्याकडून मिळालेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात मोठा उपयोग झाल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्यात सकारात्मक बदल घडल्याचे नमूद करून त्यांनी प्राध्यापकांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
संविधान दिनानिमित्त विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाते, सरकारी वकील बी. डी. कांबळे, सीडीपीओ संजुकुमार सदलगे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष एस. व्ही. नांद्रे, सचिव एम. जी. वड्डर, खजिनदार एस. जे. जौगुले, सहखजिनदार शानूर हुसेन, डी. एम. कोरबू, एस. एम. कांबळे, पी. ए. चौहान, ए. बी. पाटील, पी. एल. नदाफ, एस. एस. बिरनगी, ज्येष्ठ वकील अभयकुमार अकीवाटे, एस. बी. पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
वकील बाहुबली मगदूम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. वकील ए. एस. मुतारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वकील अर्चना पाटील आणि प्रकाश कनाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर वकील शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.


Recent Comments