गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याचा आणि बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचा अपमान केल्याचा आरोप करत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने नाराजी व्यक्त केली.
बेळगावात समितीच्या वतीने आंदोलन करून लिंबाळे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषिकांसह संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका समितीने मांडली. साहित्य परिषद आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास बेळगावकरांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यासंदर्भात साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निवेदन पाठवण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सूरज कुडचीकर, विनायक कावळे, प्रवीण रेडेकर, श्रीकांत कदम, कौशिक शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments