Belagavi

संविधान भारताच्या विविधतेला जोडणारी शक्ती : डॉ. नरेंद्र जाधव

Share

भारतीय संविधानाने देशाच्या विविधतेला एकत्र बांधून लोकशाहीला भक्कम पाया दिला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा भाग बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले.

कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन पीठातर्फे गुरुवारी बेळगावातील कन्नड भवन येथे एकदिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्ययन पीठाने संपादित केलेल्या ‘विवेक, वैचारिकता आणि गणराज्य : डॉ. आंबेडकर’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

‘भारतीय संविधानाची ७७ वर्षे : सिंहावलोकन आणि भविष्यवेध’ या विषयावर बोलताना डॉ. जाधव यांनी, आजची तरुण पिढी सामाजिक विषमता समजून घेत असून अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे महत्त्व जाणत असल्याचे सांगितले. धर्म, जात, भाषा आणि पंथ यांतील विविधतेनंतरही सुमारे १४४ कोटी भारतीयांना एकाच राष्ट्रीय चौकटीत बांधण्याचे काम संविधानाने केले आहे, असे ते म्हणाले. शाळा-महाविद्यालयांत नागरिकशास्त्र आणि संविधानाचे शिक्षण महत्त्वाच्या विषयांप्रमाणे दिले पाहिजे. संविधान शिक्षणातून लोकशाही मूल्ये, सहजीवन, समता आणि नागरिकांची जबाबदारी रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे राजकीय विश्लेषक डॉ. अजय गुडवर्ती यांनी भारतीय संविधान सामाजिक क्रांतीच्या विचारांतून प्रेरित असल्याचे सांगितले. सामाजिक सक्षमीकरणासोबतच समाजातील सर्व घटकांमध्ये बंधुभाव निर्माण होणे आवश्यक आहे. समुदायांमध्ये खऱ्या अर्थाने बंधुता निर्माण झाल्यासच देश प्रगती करू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे कुलसचिव श्रवण नायक यांनी संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असून प्रत्येक नागरिकाचे हक्क, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी त्यावर असल्याचे सांगितले. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरली पाहिजेत, असे ते म्हणाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी, सात दशकांहून अधिक काळाचा प्रवास करूनही संविधानाने आपली मूल्ये आणि प्रासंगिकता कायम राखली असल्याचे सांगितले. बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जात संविधान विकसित होत असून ते केवळ प्रशासनासाठीची मार्गदर्शक पुस्तिका नसून लोकशाहीची जिवंत शक्ती आहे. तरुणांमध्ये हक्कांची जाणीव, कर्तव्यभावना आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्यात संविधान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावातील सामाजिक आणि विकास कार्यकर्ते दिलीप कामत यांनी ‘आंबेडकरांचा संविधानवाद : संवैधानिक नैतिकता, हक्क आणि आजचा सामाजिक न्याय’ या विषयावर विचार मांडले.

यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत ‘महिंद्रा प्राइड क्लासरूम’ राबविण्यासाठी कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि नांदी फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमाला मूल्यांकन कुलसचिव प्रा. डी. एन. पाटील, वित्त अधिकारी प्रा. बी. एस. नावी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन पीठाचे संचालक तथा संमेलनाचे समन्वयक प्रा. अशोक ए. डिसोजा यांनी प्रास्ताविक केले. सहसंघटन सचिव डॉ. अश्विनी एम. जामुनी यांनी आभार मानले. संघटन सचिव डॉ. किरणकुमार पी., डॉ. महेशकुमार एन., डॉ. संजय कांबळे, डॉ. महांतेश कुरी, पदव्युत्तर विभागांचे प्रमुख, सिनेट सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: