Belagavi

बेळगावात ‘नेक्स्ट जनरेशन नारी शक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन

Share

सोशल मीडियाच्या आहारी न जाता तरुणांनी आपल्या जीवनातील ध्येय आणि यश संपादन करण्यावर लक्ष केंद्रित करावे. पालकांनी मुलांसाठी वेळ देऊन त्यांच्या दैनंदिन वर्तनावर लक्ष ठेवणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे एलएसए हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शीबा एन. यांनी सांगितले.

शहरातील श्रीनगर येथील कित्तूर राणी चन्नम्मा हाउसिंग सोसायटीमध्ये विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या वतीने आयोजित ‘नेक्स्ट जनरेशन नारी शक्ती’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

जीवनात अपयश येणे स्वाभाविक असून, त्याचा धैर्याने सामना करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी विकसित करावी. मुलांच्या मोबाईल वापराबाबत पालकांनी सतर्क राहावे. मुलांसोबत अधिक वेळ घालवून त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

वक्ते एन. आर. दामोदर शर्मा यांनी तरुणांनी पाश्चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणात न पडता देशाची संस्कृती, भाषा, परंपरा आणि आचारविचारांचा आदर करावा, असे सांगितले. वयाच्या टप्प्यावर निर्माण होणाऱ्या आकर्षणांना बळी न पडता ध्येय आणि यशाकडे वाटचाल करावी. पालकांच्या त्यागाची जाणीव ठेवावी. देशाचा इतिहास आणि योगदान समजून घेऊन जातिभेद बाजूला ठेवत भारतमातेचे अभिमानी नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिशा भारतच्या कार्यकर्त्या जयश्री यांनी विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी व्हिडिओ दाखवून संवाद साधला.

कार्यक्रमाला राणी चन्नम्मा महिला बँकेच्या अध्यक्षा राजेश्वरी एम. कवटगीमठ, विजय ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या संचालिका सुनीता पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष गोवर्धन राव, श्रीकांत कदम, आरएसएसचे प्रांत सह व्यवस्था प्रमुख कृष्णानंद कामत, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सुनीता तिम्मनगौडर आणि जेएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. अश्विनी अंगडी उपस्थित होते.

मातृशक्तीच्या प्रमुख डॉ. अश्विनी भागोजी यांनी प्रास्ताविक केले. स्मिता तिगडी यांनी सूत्रसंचालन केले. स्पूर्ती कोंकणी यांनी वंदे मातरम् गीत सादर केले, तर श्वेता माळक्कण्णवर यांनी आभार मानले.

कार्यक्रमात विविध महिला संघटनांच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने जेन झी विद्यार्थिनी आणि मातांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Tags: