State

सोनिया गांधी त्यागाचे प्रतीक : मंत्री यू. टी. खादर

Share

कर्नाटकाचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री यू. टी. खादर यांनी सोनिया गांधी यांच्या त्यागाचे कौतुक करत भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा करण्याचे आवाहन केले.

सोनिया गांधी या त्यागाचे प्रतीक असून त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरा आत्मसात केल्या आहेत. सासू इंदिरा गांधी आणि पती राजीव गांधी यांच्या हत्येचे दुःख सहन करूनही त्यांनी राजकीय आव्हानांचा धैर्याने सामना केला. पंतप्रधानपदाची संधी असतानाही त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यांचे जीवन धैर्य आणि त्यागाचे उदाहरण असल्याचे खादर म्हणाले. पुस्तकाचा आशय समजून घेण्यापूर्वीच भाजपकडून आक्षेप घेतले जात असून, गांधी कुटुंबाच्या लोकप्रियतेची भाजपला चिंता असल्याची टीकाही त्यांनी केली. बोफोर्स प्रकरणावरून राजीव गांधी यांच्यावर आरोप झाले असले, तरी देशाच्या संरक्षण क्षमतेत त्यांच्या योगदानाची दखल घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

सोनिया गांधी किंवा काँग्रेस या पुस्तकाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत नसून, देशाचा इतिहास, सोनिया गांधी यांचा वारसा आणि त्यांचे त्यागमय जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा पुस्तकाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे खादर यांनी टाळले. मात्र, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधानसभेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. शेतकरी, विद्यार्थी, युवक, कामगार आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या सभागृहात मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. विधानसभा हे केवळ राजकीय व्यासपीठ नसून जनतेचा आवाज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांनी दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Tags: