Belagavi

बेळगावात ‘क्राइस्ट द किंग’ उत्सव भक्तिभावात साजरा

Share

बेळगावात ख्रिस्ती बांधवांनी ‘क्राइस्ट द किंग’ उत्सव भक्तिभावाने साजरा केला. यानिमित्त शहरातून भव्य धार्मिक मिरवणूक काढण्यात आली.

रविवारी शहरातील विविध चर्चच्या परिसरातील एक हजारहून अधिक ख्रिस्ती बांधव या उत्सवात सहभागी झाले. सायंकाळी ४ वाजता फातिमा कॅथेड्रल येथे विशेष प्रार्थनेने मिरवणुकीला सुरुवात झाली. सेंट पॉल हायस्कूल, हाय स्ट्रीट, कॅटल रोड, हॅवलॉक रोड आणि खानापूर रोडमार्गे निघालेली मिरवणूक सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सेंट अँथनी चर्च येथे पोहोचली.

मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी बिशप डेरेक फर्नांडिस यांनी पवित्र साक्रामेंट हातात घेऊन नेतृत्व केले. यावेळी शेकडो भाविक भक्तिगीते आणि प्रार्थना म्हणत सहभागी झाले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना बिशप डेरेक फर्नांडिस यांनी येशू ख्रिस्तांच्या शिकवणींचे स्मरण करून दिले. समाजात शांती, प्रेम, करुणा आणि परस्पर सौहार्द जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शहरातील विविध चर्चमधील भाविकांनी या उत्सवात सहभागी होत ख्रिस्ती समाजातील एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडविले.

Tags: