कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी
विजापूर जिल्ह्यातील इंडी मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, तो सोडवण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी केला. पाणीप्रश्न सुटत नसेल तर इंडीला महाराष्ट्र राज्यात सामील करण्याची मागणी करावी लागेल, असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले.

विजापूर येथील जिल्हा पंचायत सभागृहात पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केडीपी बैठकीत ते बोलत होते. इंडी मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आम्ही थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आलो आहोत. कदाचित महाराष्ट्रात गेल्यास तरी पाण्याचा प्रश्न सुटेल, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून जिल्ह्यातील सर्व भागांना समान पाणीवाटप होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मागील पावसाळ्यात पाऊस कधी सुरू झाला, धरणात किती पाण्याची आवक झाली आणि तलाव भरण्यासह विविध कामांसाठी कोणत्या निर्णयानुसार पाणी सोडण्यात आले, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून मागितली. आयसीसी बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पाणीवाटपात अनियमितता होत असून शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नसल्याने प्रत्येक सिंचन योजनेत त्यांनाच सातत्याने त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी नियमितपणे केडीपी बैठक घ्यावी. पावसाळ्यात करण्यात आलेल्या पाणीवाटपाचा तपशील आणि आगामी काळातील नियोजन यांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी सादर करावी, अशी मागणीही आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी केली.


Recent Comments