State

शिक्षक हे राष्ट्रनिर्माते; विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची प्राचार्यांवर जबाबदारी ; मुख्यमंत्री

Share

शिक्षणातून केवळ पदवीधर नव्हे, तर सक्षम नेतृत्व आणि सामाजिक जाणीव असलेली पिढी घडविण्यावर भर देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवनियुक्त महाविद्यालयीन प्राचार्यांना केले. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही नेतृत्वाची संधी मिळावी आणि शिक्षणसंस्था भेदभावमुक्त असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बेंगळुरू येथील ज्ञानज्योती सभागृहात सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या नवनियुक्त प्राचार्यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एक पुस्तक, एक लेखणी आणि एक शिक्षक संपूर्ण देशाचे भविष्य बदलू शकतात, असे सांगत त्यांनी शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर चांगल्या समाजनिर्मितीसाठी दिले पाहिजे, असे स्पष्ट केले. महाविद्यालयांचे प्रशासन सक्षम करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेला वाव देणे ही प्राचार्यांची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नमूद केले.

महाविद्यालयांमध्ये जात, धर्म, द्वेष आणि भेदभावाला स्थान नसावे, मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच रॅगिंगमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी सूचना त्यांनी केली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुकांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचेही सांगितले. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात दोन हजार शाळा दत्तक घेण्याचे नियोजन असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असून, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्राचार्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.

Tags: