Bagalkot

जैन समाजाच्या मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून ‘जैन चलो’ पदयात्रा

Share

जैन समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा ४ डिसेंबरपासून चिक्कोडीतून सुवर्णसौधपर्यंत ‘जैन चलो’ पदयात्रा काढण्यात येईल, असा इशारा वरूरचे आचार्य श्री १०८ गुणधर नंदी महाराज यांनी दिला. मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जैन समाजाची एकजूट, विकास आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ येथील जिनसेना आचार्य गुरुकुलमध्ये महामंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. वरूर आणि हुबळीचे आचार्य श्री १०८ गुणधर नंदी महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीचे जैन समाजाच्या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. जिल्ह्यातील विविध भागांतून शेकडो जैन बांधव सहभागी झाले होते. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाली.

जैन विकास निगम मंडळाची स्थापना, जैन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे आणि शिष्यवृत्ती, ऐतिहासिक जैन मंदिरांचे संरक्षण तसेच जैन साधू-संतांना योग्य सुरक्षा देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी गुणधर नंदी महाराज यांनी सरकारला स्पष्ट इशारा देताना, अधिवेशनापूर्वी मागण्यांची पूर्तता न झाल्यास ४ डिसेंबरपासून चिक्कोडीतून बेळगावच्या सुवर्णसौधपर्यंत भव्य ‘जैन चलो’ आंदोलन पदयात्रा काढण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच जैन समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न देणाऱ्या आणि समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार व लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.

Tags: