gokak

मतदान न करणाऱ्यांनाही सोबत घेऊन राजकारण करणे गरजेचे : रमेश जारकीहोळी

Share

मतदान करणारे आणि न करणारे, दोघांनाही आपले मानून राजकारण केले तरच टिकता येईल, अन्यथा माजी व्हावे लागेल, अशी टिप्पणी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केली. पंचायत भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणात जातीय समीकरणांपेक्षा प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचे सांगत कत्ती कुटुंबावरही टीका केली.

जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत योजनेच्या अनुदानातून ६० लाख रुपये खर्चून नव्या पंचायत भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर स्थानिकांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना रमेश जारकीहोळी म्हणाले, मतदान करणे हा नागरिकांचा लोकशाही अधिकार आहे. एखाद्याने मतदान केले नाही म्हणून त्याच्यावर राजकीय आकस ठेवणाऱ्यांना आमदार होण्याचा अधिकार नाही. असे किरकोळ राजकारण केले असते तर आपणही राजकारणातून बाहेर पडलो असतो.

निवडणूक संपल्यानंतर मतदानाचा विषय बाजूला ठेवून सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. मतदान केलेले आणि न केलेले सर्वजण आपलेच आहेत, ही भूमिका ठेवल्यामुळेच आपण इतकी वर्षे राजकारणात टिकून आहोत. केवळ एका जातीच्या आधारावर राजकारण करता येत नाही. मतदारांना प्रेम आणि विश्वासातून जिंकावे लागते, धमकावून किंवा दबाव टाकून मते मिळवता येत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण यावेळी राजकारणातून बाहेर पडण्याचा विचार केला होता; मात्र जनतेला अनेक कामे करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या विरोधी पक्षात असून, भविष्यात आपले सरकार आल्यावर ही कामे पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कत्ती कुटुंबावर टीका करताना ते केवळ बोलण्यात पटाईत असून, प्रत्यक्ष काम करणारे नाहीत, असा टोला रमेश जारकीहोळी यांनी लगावला.

यानंतर नंदगाव आणि मुत्नाळ येथील सरकारी प्राथमिक शाळांच्या नव्या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा पंचायत कनिष्ठ अभियंता शिवलिंग, गटशिक्षणाधिकारी जी. बी. बळिगार, गुरुपुत्र कोटबागी, धरेप्पा मगदूम, गंगराय नायक, शानूल हत्तिवाले, संजय मेत्री, महानिंग अप्पोजप्पागोळ यांच्यासह सावळगी, खानापूर, नंदगाव आणि मुत्नाळ येथील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

Tags: