Belagavi

पोलीस आणि माध्यमे ही एकाच नाण्याच्या दोन बाजू : आयजीपी संदीप पाटील

Share

पोलीस विभाग आणि प्रसारमाध्यमांचे कार्य एकमेकांशी साधर्म्य असणारे असून, दोन्ही क्षेत्रांतील व्यक्तींना चोवीस तास कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर राहावे लागते. परस्पर सहकार्य आणि समन्वयातूनच समाजात शांतता व सुव्यवस्था राखणे शक्य आहे, असे मत उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

बेळगाव पत्रकार संघ आणि नागनूर रुद्राक्षीमठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गान सन्मान’ कार्यक्रमात ते बोलत होते. सण, सुट्ट्या किंवा रविवार असा कोणताही भेद न करता पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांना आपले कर्तव्य बजावावे लागते. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते. अलीकडे जिल्ह्यात पार पडलेल्या मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांसोबतच नागरिक आणि माध्यमांचे सहकार्यही महत्त्वाचे ठरले. पोलीस विभागाच्या सेवेची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डिजिटल माध्यमांच्या आगमनामुळे पत्रकारितेत मोठे बदल झाले असून, घटना घडताच बातमी देण्याचा दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीतही पोलीस आणि माध्यमांमधील चांगले संबंध कायम राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या दिव्य सान्निध्यात बोलताना नागनूर रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात अधिकाऱ्यांना खुलेपणाने आणि स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळते. त्यांना नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभते. जिल्ह्यातील पत्रकार वस्तुनिष्ठ वार्तांकनाला प्राधान्य देत असून, सामाजिक भान जपणाऱ्या बातम्या समाजाच्या विकासासह जनजागृतीसाठी उपयुक्त ठरतात. पत्रकार आणि अधिकाऱ्यांनी जनहिताला प्राधान्य देऊन जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस आयुक्त प्रकाश निखम यांनी पत्रकारिता हे समाजाचे मत घडवणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. समाजाची दिशा ठरवण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. वेगवान माहितीच्या युगात बातम्यांची अचूकता आणि सत्यता तपासूनच वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी तंत्रज्ञानातील बदलांनुसार माध्यम क्षेत्रानेही नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पुढे जाण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून, माध्यमांनीही डिजिटल तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. पोलीस आणि माध्यमांनी समाजहितासाठी परस्पर सहकार्याने काम करावे, असे ते म्हणाले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जोशी यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि व्यस्त व तणावपूर्ण कामातून वेळ काढून सर्वांना एकत्र येत मनोरंजनाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने ‘गान सन्मान’ कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगावातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गिरीश सोनावळकर, बेळगाव पत्रकार संघाचे सदस्य, पत्रकारांचे कुटुंबीय तसेच शेतकरी आणि कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: