मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कुमारकृपा अतिथिगृहाजवळील नूतनीकरण केलेल्या सरकारी निवासस्थानी स्थलांतर केले असून, या निवासाला ‘गंगा’ असे नाव दिले आहे.
सोमवारी सदाशिवनगर येथील खासगी निवासस्थानातून नव्या सरकारी निवासस्थानी दाखल झाल्यानंतर शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत खासगी पूजा करून त्यांनी नव्या निवासात प्रवेश केला. निवासातील खोल्यांना राज्यातील विविध नद्यांची नावे देण्यात आली आहेत. गुरुवारी राज्यातील सर्व २२४ आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यानंतर अधिकृत भेटींना सुरुवात होईल. नागरिकांच्या भेटीसाठी शेजारीच ‘कृष्णा’ होम ऑफिस आणि तातडीच्या बैठकांसाठी स्वतंत्र सभागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

निवासाच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, जुन्या वारसा वास्तूचा केवळ दहा टक्के भाग कायम ठेवून नूतनीकरण करण्यात आल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. घरातील ८० ते ९० टक्के फर्निचर जुन्या निवासस्थानातील आणि यापूर्वी कुमारकृप येथे वापरलेले आहे. फरशीसाठी ६० रुपये किमतीचे कोटा स्टोन आणि ८० रुपये किमतीचे ग्रॅनाइट वापरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी टीका करण्याऐवजी निवासस्थानी येऊन पाहणी करावी, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. नियोजित कार्यक्रमांसाठी दिल्लीला जाऊन रात्रीपर्यंत बंगळुरूला परतणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Recent Comments