Chikkodi

शेतकरी नेते चून्नप्पा पुजारी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ चिक्कोडीत रास्ता रोको

Share

शेतकरी नेते चून्नप्पा पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ चिक्कोडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. नागरमुन्नोळी येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.

चिक्कोडी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष मनोज मनगोळी यांच्या नेतृत्वाखाली नागरमुन्नोळी येथील प्रमुख चौकात शेतकरी जमले. त्यांनी निपाणी-मुधोळ राज्य महामार्ग रोखून धरत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना मनोज मनगोळी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेते चून्नप्पा पुजारी यांना अन्यायाने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप केला. सरकार आणि पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आंदोलकांनी राज्य सरकारच्या धोरणांसह पोलिसांच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

चून्नप्पा पुजारी यांची तातडीने बिनशर्त सुटका करावी, अन्यथा आगामी काळात संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.

Tags: